शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील खेळाडूंनी देशाचे नाव उंचवावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

21

सांगली : राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आज उद्‌घाटन संपन्न झाले. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी राज्यभरातून विद्यार्थिनी खेळाडू, पंच आले आहेत. खेळाडूंनी संघभावना ठेवत जिद्दीने उत्कृष्ट कामगिरी करावी. महिला क्रिकेट विश्वचषकातील खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेऊन जगभरात देश व महाराष्ट्राचे नाव उंचावावे, अशा शुभेच्छा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, माजी तालुका क्रीडा अधिकारी उमेश बडवे, महाविद्यालयाचे रितेश शेठ, प्रकाश शाह आदि मान्यवर उपस्थित होते.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 19 वर्षांआतील मुलींच्या वयोगटासाठी ही स्पर्धा होत असून ती 4 तारखेपर्यंत चालणार आहे.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय महिला संघ व त्यात सहभागी असलेल्या सांगलीची क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे विशेष अभिनंदन केले. तसेच, राज्यभरातून आलेल्या खेळाडुंना महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेच्या चांगल्या आयोजनासाठी त्यांनी संयोजकांचेही कौतुक केले.

खासदार विशाल पाटील यांनी खेळाडूंनी संघभावनेने खेळून स्पर्धेचा आनंद लुटावा. यश अपयशाच्या पलिकडे जाऊन स्पर्धेत खिला़डू वृत्तीने सहभागी व्हावे व यशस्वी कामगिरी करावी, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्रिया घोटसकर (पुणे) व मनवा पाटील (इस्लामपूर) या भारताचे प्रतिनिधीत्व केलेल्या खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम. टी. देसाई, तालुका क्रीडा अधिकारी विकास माने, क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे, आरती हळिंगळी यांच्यासह राज्यभरातून आलेल्या खेळाडु उपस्थित होत्या. यावेळी खेळाडुंना शपथ देण्यात आली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते मैदानपूजनाने स्पर्धेची सुरवात करण्यात आली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.