पुणे पदवीधर निवडणूक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्याच्या नियोजनासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक
सांगली, १७ ऑक्टोबर :पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचाराला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी आणि नियोजनासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सांगली येथे महायुती व भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्याचे चोख नियोजन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार तळागाळातील मतदारांपर्यंत कसा पोहोचवायचा, याची प्रभावी रणनीती आखण्यात आली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगामी दौऱ्याच्या अनुषंगाने उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना दिल्या.
या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहराध्यक्ष प्रकाश ढंग, माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ नेते सत्यजीत देशमुख, प्रशांत ठाकूर, शरद लाड आणि सांगलीचे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.