सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सेन्सॉर बोर्ड) माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक अत्यंत अनुभवी, बहुआयामी आणि खंबीर व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यांनी निहलानी यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पहलाज निहलानी यांनी ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात त्यांच्या कामाची आठवण काढत सांगितले की, “‘आंखे’, ‘शोला और शबनम’ यांसारख्या कौटुंबिक आणि प्रचंड गाजलेल्या चित्रपटांद्वारे त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत आपले मोलाचे योगदान दिले. त्यांनी अनेक नवोदित कलाकारांना चित्रपटसृष्टीत मोठी संधी मिळवून दिली.”
चित्रपट निर्मितीसोबतच निहलानी यांनी चित्रपटसृष्टीतील विविध संघटनांचे नेतृत्व केले. सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत चर्चेत आणि प्रभावी राहिली. “एक धाडसी निर्माते, कुशल संघटक आणि कडक प्रशासक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी दीर्घकाळ महत्त्वपूर्ण कार्य केले,” अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचा उल्लेख केला. शेवटी, “ईश्वर दिवंगत पहलाज निहलानी यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि या कठीण प्रसंगी निहलानी परिवाराला हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,” हीच प्रार्थना करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या तीव्र शोकसंवेदना व्यक्त केल्या.
पहलाज निहलानी यांनी गुनाहों का फैसला, पाप की दुनिया, मिट्टी और सोना, शोला और शबनम आणि आंखे यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. यापैकी आंखे हा 1990 च्या दशकातील सर्वांत मोठ्या बॉलिवूड ब्लॉकबस्टर्सपैकी एक ठरला होता. चित्रपट निर्मितीसोबतच निहलानी यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवलं होतं. 2012 मध्ये त्यांनी अवतार चं दिग्दर्शन केलं होतं. 2015 मध्ये सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.