महाराष्ट्रातील संशोधनाला मिळणार पेटंटचे कवच; मुंबईत लवकरच ‘मंत्र’ केंद्र सुरू होणार – मंत्री चंद्रकांत पाटील

8

मुंबई : राज्यातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांमधील नाविन्यपूर्ण संशोधनाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ‘मंत्र’ (MANTRA) बौद्धिक संपदा (IPR) केंद्राच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (DPR) सादरीकरण करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने मुंबई येथे लवकरच हे ‘मंत्र’ बौद्धिक संपदा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. हे केंद्र राज्यातील शैक्षणिक संस्थांच्या प्रगतीसाठी आणि संशोधकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

‘मंत्र’ केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे:

पेटंट संरक्षण: राज्यातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या संशोधनाला कायदेशीर पेटंट संरक्षण मिळवून देणे.

तंत्रज्ञान हस्तांतरण: प्रयोगशाळेत झालेले संशोधन प्रत्यक्ष बाजारात आणि उद्योगांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘टेक्नॉलॉजी ट्रान्सफर’ सुलभ करणे.

उद्योग-शैक्षणिक समन्वय: उद्योग जगताची गरज आणि संस्थांमधील संशोधन यांच्यात प्रभावी समन्वय साधणे.

संशोधनाचे व्यावसायिकीकरण: वैज्ञानिक शोधांचे रूपांतर व्यावसायिक उत्पादनांमध्ये करून रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण करणे.

या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महाराष्ट्रातील नवोपक्रमांना (Innovations) मोठी चालना मिळणार असून, राज्याची एकंदर संशोधन क्षमता अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) चे कुलगुरू तथा बौद्धिक संपदा समितीचे अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध पंडित, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, सदस्य सचिव प्रा. समीर कुलकर्णी, सदस्य प्रा मृदूला बेळे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.