राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक पराग वेदक यांच्या अकाली जाण्यामुळे संवेदनशील व्यक्ती असलेला समाजसेवक आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनातला एक महत्त्वाचा, खंदा दुवाही निखळला – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि गिरगावच्या ऐतिहासिक हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे जनक पराग वेदक यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, “पराग वेदक यांच्या जाण्याने संवेदनशील समाजसेवक आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनातला एक महत्त्वाचा, खंदा दुवा निखळला आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, एक ध्येय ठरवून त्यासाठीच जगणारे त्यांच्याच नव्हे तर इतरांच्याही जगण्याला अर्थ देतात. अशांच्या यादीत पराग वेदक यांचं नाव नेहमीच वरच्या क्रमांकावर असेल. मराठी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेच्या संवर्धनाचं ध्येय कायम डोळ्यांसमोर ठेवलेला एक सच्चा कार्यकर्ता पराग वेदक यांना गिरगावातील स्वागतयात्रेचा जनक म्हणूनही ओळखलं जातं. समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्या वेदक यांनी मराठी जनमानसाच्या हिताचं कार्य नेहमीच निःस्वार्थपणे केलं.
स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचेही पराग वेदक संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी सिनेटचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच कार्यकर्ते म्हणूनही ते सुपरिचित होते. तेव्हापासून आम्हा दोघांमध्ये तयार झालेलं मैत्रीचं नातं कायम राहिलं. एक जवळचा मित्र म्हणून पराग नेहमीच लक्षातही राहील. त्यांच्या जाण्याचं वृत्त मनाला चटका लावणारं आहे. दुर्धर आधारावर मात करून पराग वेदक त्यांचं कार्य अधिक जोमानं पुढे नेतील, असं वाटत होतं. पण, नियतीच्या मनात वेगळंच होतं.
त्यांच्या अकाली जाण्यामुळे संवेदनशील व्यक्ती असलेला समाजसेवक आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनातला एक महत्त्वाचा, खंदा दुवाही निखळला आहे.
परागजी, तुम्ही नेहमीच स्मरणात राहाल. या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वर वेदक कुटुंबीयांना देवो अशी प्रार्थना पाटील यांनी केली.