मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभाविप शिष्टमंडळासोबत विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक अडचणींबाबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न
मुंबई : मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘सिंहगड’ येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) शिष्टमंडळासोबत विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक अडचणींबाबत एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेचा लाभ न देणाऱ्या व शुल्क आकारणाऱ्या दोषी महाविद्यालयांवर आणि सोलापूर विद्यापीठांतर्गत घटकांवर तातडीने चौकशी करून कठोर कारवाईचे निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले. तसेच परीक्षा-निकाल प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, प्राध्यापक भरतीला गती देणे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्व विद्यापीठांनी महिन्यातून किमान एकदा विद्यार्थी संघटनांसोबत समन्वय बैठक घेण्याबाबत सूचना देखील पाटील यांनी दिल्या.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसचिव संतोष खोरगडे, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिष्टमंडळ उपस्थित होते.