वांद्रे शासकीय तंत्रनिकेतनच्या समस्यांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी आढावा बैठक; पुढील आठवड्यात करणार प्रत्यक्ष पाहणी
मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील शासकीय तंत्रनिकेतन (Government Polytechnic) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या ‘सिंहगड’ या शासकीय निवासस्थानी एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या व अडचणी मांडल्या.
या बैठकीत वांद्रे तंत्रनिकेतन मधील प्रयोगशाळांमधील अपुऱ्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची (Hostel) सद्यस्थिती, कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण होणारा संभाव्य धोका, प्राध्यापकांची भासणारी कमतरता आणि स्वच्छतागृहांची दुरावस्था या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन, कॅम्पसमधील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखण्याचे तसेच विद्यार्थ्यांना पुरेशा शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
केवळ बैठकीपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या समस्यांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील हे पुढील आठवड्यात शासकीय तंत्रनिकेतन, वांद्रे येथे स्वतः भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते महाविद्यालय प्रशासनासोबत चर्चा करून परिस्थितीचा अंतिम आढावा घेणार आहेत.
या बैठकीला तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी, शासकीय तंत्रनिकेतन, वांद्रे येथील अधिकारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.