प्राध्यापक भरती आणि प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; दर आठवड्याला आढावा घेणार – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या शिष्टमंडळाने या बैठकीत उच्च शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांच्या विविध ज्वलंत समस्या मांडल्या.
या बैठकीत महासंघाच्या वतीने राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील नियमित प्राध्यापक भरती प्रक्रिया गतिमान करणे, मंजूर असलेली रिक्त पदे तातडीने भरणे आणि कार्यरत प्राध्यापकांचे पदसंरक्षण करणे यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महासंघाच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक दिलासा दिला. ते म्हणाले, शैक्षिक महासंघाने मांडलेल्या सर्व न्याय्य मागण्यांची कायदेशीर बाजू तपासून राज्य सरकार यावर सकारात्मक निर्णय घेईल. प्राध्यापकांचे प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित राहू नयेत, यासाठी आता दर आठवड्याला मंत्रालयात विशेष आढावा बैठक घेतली जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिली.
या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, अमोल मुत्याल आणि प्रताप लुबाळ, तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर, महासचिव डॉ. दिलीप अर्जुने आणि महासंघाचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते.