‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ भारताला जागतिक स्तरावर ज्ञानगुरु बनवेल; पुण्यात ‘ज्ञानमंडपम्’ वास्तूच्या उद्घाटनाप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

3

पुणे : पुणे येथे महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन व भव्य ‘ज्ञानमंडपम्’ या वास्तूचा दिमाखदार उद्घाटन सोहळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह आदरणीय भय्याजी जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या विशेष प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून नूतन वास्तूचे कौतुक केले आणि संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर विशेष प्रकाश टाकला. ते म्हणाले, देशाच्या शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवण्यासाठी लागू झालेले ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ (NEP 2020) महाराष्ट्रात २०२२ पासून टप्प्याटप्प्याने अत्यंत प्रभावीपणे लागू करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून बनवलेल्या या धोरणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे आणि आपल्या भारताला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा ‘ज्ञानगुरु’ म्हणून प्रस्थापित करणे हाच आहे.

पुढे बोलताना त्यांनी या धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट केली. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या कौशल्यांना वाव मिळण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण, व्यवसायाभिमुखता (रोजगारक्षमता), संशोधनाला चालना, भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्काराधिष्ठित शिक्षण या पंचसूत्रीवर नवीन धोरणात विशेष भर देण्यात आला आहे, असे त्यांनी नमूद केले. या धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीत आणि राज्यातील शैक्षणिक विकासात ‘महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळा’चे योगदान अत्यंत मोलाचे आणि कौतुकास्पद आहे, अशी कृतज्ञता व भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, संस्थेचे अध्यक्ष सदानंद फडके, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, नियामक मंडळ अध्यक्ष सुधीर काळकर, उपाध्यक्ष राधेशाम आग्रवाल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.