कर्वेनगर येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘दिवाळी प्रदर्शन केंद्राचे’ भव्य उद्घाटन; महिला उद्योजकांना बळ देण्याचे नागरिकांना आवाहन
पुणे : महिला बचत गट आणि महिला उद्योजकांच्या दर्जेदार उत्पादनांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, दिवाळीचे औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या वतीने कर्वेनगर येथे आयोजित ‘दिवाळी प्रदर्शन केंद्राचे’ उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. याप्रसंगी मंत्री पाटील यांनी सर्व उपस्थित नागरिक आणि महिला भगिनींना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
उद्घाटन सोहळ्यात बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या विशेष प्रदर्शन केंद्रामुळे महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यासोबतच त्यांच्यातील उपजत कलागुणांना मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. या दिवाळीत आपल्या स्थानिक महिला उद्योजकांना खऱ्या अर्थाने आर्थिक बळ देण्यासाठी नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. येथील उत्पादनांची खरेदी करून महिलांचा उत्साह द्विगुणित करावा.
या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यास माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, माजी नगरसेविका रेश्माताई बराटे, तेजश्री पवळे, माजी नगरसेवक सुशील मेंगडे आणि शिवरामपंत मेंगडे यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, भाजप-महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि कर्वेनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.