मतदान संपल्यानंतर पुण्यात रंगली ‘भेळ-भत्त्याची’ पारंपरिक मैफल; मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत अनुभवले निवांत क्षण
पुणे : पुण्याच्या राजकीय संस्कृतीत निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकत्र जमणे, प्रचारातील अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि भेळ-भत्त्याचा आस्वाद घेत काही निवांत क्षण घालवणे, ही एक अत्यंत जुनी आणि खास परंपरा आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या याच पारंपरिक शैलीत सर्व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.

गेले अनेक दिवस अविरत सुरू असलेल्या प्रचार मोहिमेच्या सांगतेनंतर आयोजित या स्नेहमेळाव्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत निवांत गप्पा मारल्या. प्रचारादरम्यान आलेले गमतीशीर अनुभव, आठवणी आणि विविध राजकीय विषयांवर चर्चा करत सर्वांनी एकत्रितपणे पुण्याच्या प्रसिद्ध भेळ-भत्त्याचा आस्वाद घेतला. या अनौपचारिक संवादाने कार्यकर्त्यांमधील थकवा दूर होऊन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी घेतलेली अपार मेहनत, दाखवलेली एकजूट आणि जपलेले स्नेहबंध यांमुळेच आपले संघटन अधिक बळकट होत असते. हे स्नेहबंध असेच कायम राहतील.”
या मनमोकळ्या संवाद प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश पांडे, पुनीत जोशी आणि गिरीश खत्री यांच्यासह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत अहोरात्र कष्ट केलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.