डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनादिनानिमित्त नवनिर्मित वास्तूचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भव्य लोकार्पण!
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक व शैक्षणिक क्षेत्राचा मानबिंदू असलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (DES) स्थापनादिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या नवनिर्मित वास्तूचा लोकार्पण सोहळा आज पुण्यात अत्यंत उत्साहात पार पडला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या नूतन वास्तूचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
लोकार्पणानंतर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुढील वाटचालीस तसेच संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रातील गुणात्मक वाढ आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी संस्थेने उचललेले हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या दिमाखदार सोहळ्याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे आणि कार्यवाह आनंद काटीकर यांच्यासह शिक्षण, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर, प्राध्यापक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.