त्यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित, मी पहिल्यापासून सांगतोय; देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादीला डिवचले
मुंबई: शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी शरद पवार आणि आघाडीवर केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनंत गीते यांचं विधान सत्य परिस्थितीवर आधारित आहे. मी पहिल्यापासून सांगतोय की हे अनैसर्गिक युती आहे, यांचं सरकार नीटपणे चालू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.
दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही, असेही गीते म्हणाले होते . यावर फडणवीस म्हणाले की, गीतेंनी केलेले वक्तव्य ही सत्य परिस्थिती आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येत निर्माण केलेली आघाडी ही अनैसर्गिक आहे. अशा प्रकारची ही आघाडी कधी चालू शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले . महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेसह मिनी विधानसभेच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित झाल्याच पाहिजे,अशी भूमिका फडणवीसांनी मांडली .
गीते नेमकं काय म्हणाले?
श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.
दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.