क्रूज ड्रग्स पार्टी छाप्यावेळी एनसीबीने भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना सोडले? नवाब मलिकांचा सवाल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीने ज्या क्रुझवर छापे मारले त्या वेळी एकूण 11 जणांना पकडले होते. त्यापैकी तीन जणांना सोडण्यात आले. यात अमिर फर्निचरवाला,  रिशब सचदेव प्रतीक,  गाभा यांचा समावेश आहे. हे तिघेही भाजप नेत्यांचे नातेवाईक आहेत. छापा मारला तेव्हा क्रुझवर 1300 लोक होते. त्यापैकी केवळ निवडक 11 लोकांना पकडले. त्यातही तिघांना का सोडले? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

एका चॅनलने या तिघांचे व्हीडिओही चालवले होते. या तिघांना कसं सोडून देण्यात आलं त्याचे व्हीडिओही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. या तिघांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं मात्र सोडून देण्यात आलं. ऋषभ सचदेवाचे वडील, काका तिथे आले होते. त्यांच्यासोबत या तिघांना सोडून देण्यात आलं असा गौप्यस्फोट आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

ऋषभ सचदेवा हा भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांचे मेहुणे आहेत. मोहित कंबोज यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर दिग्गजांसोबतही मोहित कंबोज यांचे फोटो आहे. ऋषभ सचदेवाला ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर दोन तासांनी सोडून देण्यात आलं. त्यावेळी तिघांना सोडून देण्यात आलं. जे इतर दोघे आहेत प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला या दोघांनी बोलवल्यामुळेच आर्यन खान तिथे गेला होता.

1300 लोकांची क्षमता असलेल्या जहाजावर छापा मारला. त्यातल्या 11 लोकांना तुम्ही ताब्यात घेतलं. त्यानंतर या सगळ्यांना एनसीबीच्या कार्यालयात नेण्यात आलं. या तिघांना सोडून देण्यासाठी आदेश कुणी दिले याचं उत्तर एनसीबीने द्यावी. आमची माहिती अशी आहे की दिल्ली ते महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी ऋषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला आणि प्रतीक गाबा या तिघांना सोडण्याचे आदेश दिले. समीर वानखेडे यांनी याबाबत खुलासा करावा असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.