सावित्रीच्या लेकींसाठी महाराष्ट्र बंद कधी करणार; पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघ संप्तत

पुणे: पुण्यात चौदा वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेचा निषेध केला आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहे. महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींचा रोज बळी जातोय, यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद? असे म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला खडेबोल सुनावले आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यानी म्हंटले आहे की, “अतिशय भयानक… पुण्यात काय चाललंय ? कोयत्याने वार करून खून करण्यात आला. टाईप करतानाही अंगावर काटा येत आहे. त्या मुलीने काय भोगलं असेल..? राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. पोलिसांचे कायदे फक्त कागदावर आहेत. महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडत आहेत. यांच्यासाठी सरकार महाराष्ट्र बंद कधी करतंय ?”
अतिशय भयानक ?
काय चाललयं पुण्यात
कोयत्याने वार करून खून
टाईप करतांनाही अंगावर काटा येतोय काय भोगलं असेल तीने
कायदा सुव्यवस्था वार्यावर
पोलिस कायदे कागदावर
महाराष्ट्रातल्या आपल्या या सावित्रीच्या लेकी रोज बळी पडताहेत यांच्यासाठी सरकार कधी करतयं महाराष्ट्रबंद ?? @CMOMaharashtra pic.twitter.com/vXLF08U5jY— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) October 12, 2021
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार हत्या झालेली मुलगी इयत्ता आठवी वर्गात शिकत होती. हत्या करणारा आरोपी हा मृत मुलीचा नातेवाईकच आहे. या आरोपीसोबत अन्य दोन व्यक्ती होत्या. मुलगी बिबवेवाडी परिसरात कबड्डीचा सराव करत होती. यावेळी तिचा नातेवाईक तसेच इतर दोघे तिच्याकडे आले. यातील एकाने तिच्यावर कोयत्याने अचानकपणे वार करायला सुरुवात केली. यातच अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.