… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत दिसले असते; शिवसेना नेत्यांचे मोठे विधान
पंढरपूर: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काही ना काही टीका करत असतात. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी संयमाने वागले असते तर आज शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत असले असते, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव पाटील आज पंढरपूरात होते. त्यावेळी त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.
गुलाबराव पाटील यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपा नेते चंद्रकांत पाटलांवर टीका केली. कोरोनाचे संकट कमी झाल आहे. आता कायमस्वरूपी हे कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे पाटील यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी घातले.जळगावमध्ये भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. याविषयी पाटील यांना विचारले असता, भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत आहे. त्यामुळेच हे नगरसेवक आता भाजपकडे जाताना दिसत आहेत, असं त्यांनी सांगितलं. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
काँग्रेस का पडली बाहेर?
जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्व पक्षांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याची योजना हाणून पाडत काँग्रेसनं वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे. तर शिवसेनेतून नगरसेवकांच्या गळतीलाही सुरुवात झाली आहे. सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेस या प्रयत्नांत समाधानी नसल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून समोर येत होतं. अखेर काँग्रेसनं जळगावातील सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून पत्रकार परिषद घेत आपल्या या निर्णयाची माहिती दिली आहे.
शिवसेनेला जळगावमध्ये दुहेरी धक्का बसला आहे. एकीकडे जळगावातील सर्वपक्षीय आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेसनं घेतला आहे. तर दुसरीकडं इतर पक्षातून शिवसेनेत आलेले नगरसेवक स्वगृही परतत आहेत. भाजपातून आलेले 10 नगरसेवक पुन्हा मूळ पक्षात जात असून 3 नगरसेवक शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत.