पुण्यात सॉफ्टवेअर अभियंत्याचा गोळ्या झाडून खून; पोलिसांकडून IT इंजिनिअर च्या दोघा मित्रांना अटक

पुणे: पुण्यातील कोंढवा परिसरात काही दिवसांपूर्वी एका सॉफ्टवेअर अभियंत्याने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. परंतु या प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी मयत अभियंत्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

सागर दिलीप बिनावत (वय ३३, रा. श्रद्धानगर, कोंढवा) आणि दत्तात्रय देवीदास हजारे (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश तारळेकर (वय ४७, रा. सन फ्लॉवर सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुरुवातीला गणेश तारळेकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केली असावी असा संशय होता. ज्या वेळी हा प्रकार घडला त्या वेळी गणेश आणि त्यांचे दोन मित्र घरात पार्टी साजरी करत होते. त्याच्या मित्रांनी पोलिसांना ही माहिती दिली होती. मात्र पोलिसांना वेगळाच संशय होता.

त्यानंतर कोंढवा पोलिसांनी या दोन्ही मित्रांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता या दोघांनी दारू पार्टी साजरी करीत असताना संगणमत करून कोणत्या तरी कारणावरून डोक्यात गोळी झाडून गणेश तारळेकर यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी पिस्तूल विहिरीत फेकून दिल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक करून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.