जयंत पाटलांनी जेव्हा हर्षवर्धन पाटलांचा तो व्हिडीओ शरद पवारांना दाखवला!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना मावळ गोळीबाराची आठवण करुन दिली. त्यावरुन आता पुन्हा एकदा जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी काल फडणवीसांना उत्तर देताना मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला तब्बल 90 हजाराचं मताधिक्य मिळाल्याचं सांगितलं. मात्र, या गंभीर पत्रकार परिषदेतील सुरुवात त्यांनी काहीशी हटके केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचा किस्साच पवारांनी सांगितला.
पवारांचा हाच मूड जयंत पाटलांनी ओळखला. पुढच्या काही मिनिटांत जयंत पाटलांनी आपल्या खिशातला मोबाईल काढला आणि जुनेजाणते काँग्रेसचे माजी नेते, सध्याचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा सीबीआय, ईडीच्या चौकशीवरुन सूचक भाष्य केल्याचा व्हिडीओ पवारांना दाखवला.
सध्या हर्षवर्धन पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेडिंगवर आहे. तो व्हिडीओ आहे, हर्षवर्धन पाटलांनी बोलता बोलता केलेल्या गंभीर विधानाचा…! त्याचं झालं असं की एका हॉटेलच्या उद्घाटन कार्यक्रमाला हर्षवर्धन पाटील मावळला गेले होते. मंचावर विविध पक्षाचे नेते हजर होते. हर्षवर्धन पाटलांची भाषणाची वेळ आली. आता पाटलांचं भाषण म्हणजे खुमासदार शैली आणि किस्स्यांची पेरणी पेरणी… आपल्या भाषणात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून सगळं कसं व्यवस्थित चाललंय हे सांगताना आता कोणतीही चौकशी नसल्याने शांत झोप येते, असं म्हटलं. म्हणजेच बोलता बोलता त्यांनी सूचक पण तितकंच गंभीर विधान केलं.
सध्या ईडी, सीबीआयच्या धाडींचा धडाका आहे. भाजपेतर पक्षांच्या नेतेमंडळींवर ईडी-सीबीआय-आयकर विभागाच्या धाडी पडतात. केंद्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करते, असा आरोप अनेक वेळा विरोधी पक्ष करतात. त्यातच हर्षवर्धन पाटलांच्या म्हणण्याने एकप्रकारे त्यावर शिक्कामोर्तबच झालं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चौकशी होत नाही, असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता.