सत्तेत असताना तुम्ही मंत्रीपद भाड्याने दिलं होतं का?; पंकजा मुंडेंच्या टीकेला धनंजय मुंडे प्रत्युत्तर
बीड: बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करुन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपल्या भाषणातून पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यासोबतच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्याने देणं, अशा पद्धतीने आरोप करणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहिती आहे, दोन वर्षात एवढी संकटं असताना मंत्री म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काय काम करतोय. त्यामुळे त्यांना काय म्हणावं हे त्यांचा प्रश्न आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.
पंकजा मुंडे नेमक काय म्हणाल्या…
कोरोना होता, लोकांना कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते. अशी नागरिकांची अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते का? मी दौरे करुन तुमचं आरोग्य धोक्यात टाकायचं होतं का? तमुची काळजी वाटली म्हणून घरात बसली नाही तर कोविड सेंटर सुरू केलं. कोरोना संकटात नागरिकांना बेड, औषधे उपलब्ध करुन दिली. अतिवृष्टी झाली तेव्हा दौरा केला आणि दसऱ्याच्या आधी पॅकेज जाहीर करण्याचं म्हटलं, केलं की नाही दसऱ्यापूर्वी पॅकेज जाहीर. केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत.
शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तेवढी नरेंद्र मोदींची मदत येत आहे. राज्य सरकारची आली का मदत? पालकमंत्र्यांची मदत आली का? हे असं आहे त्यामुळे यांना काही बोललं की राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? आम्ही सरकारकडेच मागणार ना? तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचे नुसत्या धमक्या… असं करेन अन् तसं करेन.. आता काय आहे बीड जिल्ह्याची अवस्था. अरे आपलं मंत्रिपद यांनी भाड्याने दिलं आहे, यांचं काही चालत नाही अशी परिस्थिती आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर घणाघात केला आहे.