मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवारांमध्ये ‘वर्षा’ बंगल्यावर खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?

मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक प्रमुख महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि मंत्र्यांच्या मागे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत या दोन्ही विषयांवर महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मात्र, आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. त्याबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वीही घेतली होती भेट

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली होती. यामध्ये अवजड वाहनांवरील वाहतूक कर माफ अथवा कमी करणे, कोरोनामुळे आणि डिझेल महागाईमुळे अडचणीत असलेल्या वाहतूकदारांना दिलासा देणे. तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली होती.