ठाकरे सरकार जागरुक राहिल्यानेच कोरोना आटोक्यात – संजय राऊत
मुंबई: ठाकरे सरकार जागरूक राहिल्यानेच कोरोना काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकला. तेव्हा एकमेकांच्या सहकार्याने, नियम-कायद्यांचे पालन करुन मुंबई-महाराष्ट्रास कामधंद्यास लागू द्या. जगा आणि जगू द्या. उगाच आडवे येऊन लोकांचा छळ करु नका.’ अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.
कोरोना संकटातून बाहेर पडण्याचे नियोजन जितके महाराष्ट्राने केले, तितके ते अन्य राज्यांनी केल्याचे दिसत नाही. महाराष्ट्राने कोणत्याही बाबतीत घिसाडघाई न करता अत्यंत सावधपणे लॉक डाऊनचे टाळे उघडले आहे. दिवाळीपूर्वी सरकारने निर्बंध शिथिल केले असून दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याचा परवानाच जनतेला दिला. मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने रात्री 12 पर्यंत उघडी ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व अॅम्युझमेंट पार्कसुद्धा उघडली जात आहेत. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होत आहेत. मॉल्स आधीच उघडले आहेत.
देवळेही बंधमुक्त आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील विरोधी पक्षाने निर्बंधांच्या बाबतीत अकारण थयथयाट केला होता. मंदिरे, सण, उत्सवांवर निर्बंध घालणारे सरकार हिंदूविरोधी असल्याचे ते बोंबलत होते. या मंडळींनी रस्त्यावर येऊन घंटाही बडवल्या होत्या. त्यांनी घंटा बडवल्या म्हणून सरकारने मंदिरे उघडली नाहीत, तर डॉक्टरांच्या ‘टास्क फोर्स’ने मान्यता दिल्यावरच मंदिरांचे दरवाजे उघडले.