समीर वानखेडेंच्याविरोधात अखेर ठाकरे सरकारची चौकशीची घोषणा; 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी होणार चौकशी
मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात अखेर महाराष्ट्र सरकारने चौकशीची घोषणा केली आहे. 25 कोटी रुपयांच्या डीलप्रकरणी समीर वानखेडे यांची आता चौकशी होणार आहे. सरकारने ऑर्डर काढून चार अधिकाऱ्यांची नावेही जाहीर केली आहे.
आर्यन खान प्रकरणाची सुरुवात झाल्यापासून समीर वानखेडे आणि एनसीबीवर महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक हे आरोप करत आहेत. एकीकडे मलिकांच्या आरोपांची फैरी तर दुसरीकडे राज्य सरकारची चौकशी असा दुहेरी संकटाचा सामना समीर वानखेडे यांना करावा लागणार आहे. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केले आहे यात समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप केले आहेत. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सोडण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील होणार होती. त्यातले 8 कोटी रुपये समीर वानखेडे यांना मिळणार होते.
प्रभाकर साईल, सुधा द्विवेदी, कनिष्का जैन आणि नितीन देशमुख यांनी केलेल्या विविध तक्रार अर्जांची एकत्रित चौकशी करण्यासाठी 4 पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सरकारकडून जाहीर केली गेली आहे. गेले अनेक दिवस नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे असा सामना उभ्या महाराष्ट्राने पाहिला. आता राज्य सरकारने वानखेडेंविरोधात चौकशी लावल्याने सरकार विरुद्ध वानखेडे असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Read Also :