डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे; देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांवर पलटवार

मुंबई: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी नोटबंदीमध्ये बनावट नोटांचे रॅकेट चालवण्याचे तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक आरोप केले आहेत. मलिक यांच्या या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी लगेचचं ट्विट केलं आहे. डुकराशी कुस्ती कधीच खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे, असा घणाघाती हल्ला देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून नवाब मलिकांच्या आरोपाला तात्काळ उत्तर दिलं आहे. यासाठी फडणवीस यांनी एका सुविचाराचा आधार घेतला आहे. कोणत्याही डुकराशी कधीच कुस्ती खेळू नये हे मी आधीच शिकलो आहे. त्यामुळे तुम्हीही घाणीने माखून जाता आणइ डुकरालाही तेच आवडत असतं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.

कोणतेही आरोप झाल्यानंतर फडणवीस मीडियासमोर येऊन प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. दिवाळीपूर्वी मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे फडणवीसांशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर फडणवीस यांनी काही तासात मीडियासमोर येऊन मलिक यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, आज मलिक यांनी आरोपांची माळ लावल्यानंतर फडणवीसांनी केवळ ट्विट करून त्यांना उत्तर दिलं. तेही एका सुविचाराचा आधार घेत फडणवीसांनी उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांवर यापुढच्या काळात देवेंद्र फडणवीस हे थेट माध्यमांसमोर किंवा समाजमाध्यमातून प्रतिक्रिया देणार नाहीत, असेच संकेत मिळत आहेत. नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने तत्काळ रणनिती आखण्याची सुरूवात केली आहे. भाजपच्या निवडक नेत्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर झाली. त्यानुसार आता नवाब मलिकांविरोधात कोण बोलणार इथपासून ते केंद्राच्या यंत्रणा सक्रीय होण्याचे संकेत मिळत आहेत.