संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे; चंद्राकांत पाटलांची खोचक टोला

कोल्हापूर: अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी करण्यासाठी एनआयएने त्यांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतानाच त्यांनी आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे.
चंद्रकांत पाटील आज कोल्हापुरात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी बोलताना ही खोचक टीका केली. संजय राऊत दररोज सकाळी बोलून बोलून दमले, आता नवाब मलिक बोलत आहेत. संजय राऊत आणि मलिक यांच्यामध्येच बोलण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. संजय राऊत यांना बॉर्नविटा पिण्याची गरज आहे, असा टोला पाटील यांनी राऊत यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानदुखीच्या त्रासावर उपचार करून घेण्यासाठी मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यावरून पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सवाल केला. उद्धव ठाकरे यांना सरकारी रुग्णालय का चालत नाही? याचाच अर्थ राज्यातील सरकारी रुग्णालय सुस्थितीत नाहीत हे सिद्ध होतंय. मला वैयक्तिक टीका करायची नाही. पण देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्यानंतर ते सरकारी रुग्णालयात दाखल झाले होते, अशी आठवणही पाटील यांनी यावेळी करून दिली.
यावेळी त्यांनी मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नवाब मलिक यांना राज्यातील कोणत्याही गावात फिरू देणार नाही. एनआयएनं मलिक यांना तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली पाहिजे. मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असं सांगतानाच आम्ही चळवळीतील कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, असंही त्यांनी ठणकावलं.