उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री, राज्याला फडणवीसांसारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा
मुंबई: उद्धव ठाकरे पार्टटाईम मुख्यमंत्री आहेत. ते कधी झोपतात, कधी उठतात जनतेला ठाऊकच नसते, अशी टीका राज्याचे भाजप प्रभारी सी. टी. रवी यांनी केली आहे. त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक जशी जवळ येतेय तशीच भाजप शिवसेनेच्या वॉरला धार आणखीनच वाढत चालली आहे. आता भाजपकडून शिवसेनेला टार्गेट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्टटाईम मुख्यमंत्री असून, ते कधी झोपतात, कधी उठतात हे जनतेलाच चांगलंच ठाऊक, असा हल्लाबोल सी. टी. रवी यांनी केला आहे. त्याचवेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुलटाईम मुख्यमंत्री हवा, असे म्हणत शिवसेनेने भाजपला नाही तर जनतेला धोका दिल्याचे म्हटले आहे.
हिंमत असेल तर विधानसभा विसर्जित करा आणि निवडणुका घ्या. पुन्हा कोण जिंकेल ते कळेल, असे आव्हान शिवसेनेला सी. टी. रवी यांनी दिले. राज्यातील मुख्यमंत्री किती वाजता उठतो, बसतो हे जनतेला माहीत आहे. हे मुख्यमंत्री पार्टटाइम मुख्यमंत्री आहे. राज्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाइम मुख्यमंत्री मिळायला हवा. हिंदुत्व सोडून आता शिवसेना परिवार पार्टी राहिली आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
राज्यात परिवार वाढवण्यासाठी काम होत आहे. राज्याच्या विकासासाठी नाही. शिवसेनेने भाजपला धोका दिला नाही तर जनतेला धोका दिला आहे. लोकांनी युतीला मते दिली पण यांनी लोकांना दगा दिला. हे तीन परिवाराचे सरकार आहे. एक बारामती, एक इटली आणि तिसरा लोकांना विचार कोण तो, यांना फक्त परिवार वाढवयाचा आहे, असा हल्लाबोल सी. टी. रवी यांनी केला.