उशिरा का होईना शहाणपण आलं; पवारांचा मोदी सरकारला टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत किमत चुकवावी लागणार असल्याचं लक्षात आल्यानंतर हे कायदे मागे घेण्यात आले, असं सांगतानाच उशिरा का होईना मोदी सरकारला शहाणपण आलं आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. मोदी सरकारने कायदे मागे घेतले हे योग्यच झालं असंही त्यांनी सांगितलं. कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने हे कायदे आणले. त्यामुळे या कायद्याला विरोध झाला. देशाच्या इतिहासात एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी सीमेवर बसले. थंडी, ऊन, वारा, पावसाचा विचार न करता शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. पण त्यांनी हे केलं नाही. तिन्ही कायदे मागे घ्या असं शेतकरी संघटनेने सांगितलं. पण ऐकलं नाही.
त्यामुळे संघर्ष झाला. उत्तर प्रदेशचा काही भाग राजस्थान, पंजाब हरयाणातील लोक या आंदोलनात होते. आता पंजाब, उत्तर प्रदेशात निवडणुका आल्या. निवडणूक प्रचारासाठी गावात गेल्यावर शेतकरी जाब विचारतील हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. उशीरा का होईना शहाणपण आलं. याचं दु:ख व्यक्त करत नाही, असं सांगतानाच एक वर्ष संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असं पवार म्हणाले.
मोदींनी नेमकी काय घोषणा केली?
“कृषी कायद्यासंदर्भातील सर्व घडामोडी देशवासियांना माहिती आहेत. मी आज देशवासीयांची माफी मागतो. खऱ्या मनाने आणि पवित्र ह्रदयाने सांगू इच्छितो की आमच्या तपश्चर्येत उणीव राहिली. ज्यामुळे दिव्याच्या प्रकाशाप्रमाने असलेलं सत्य आम्ही काही शेतकरी बांधवांना समजून सांगू शकलो नाही. आज गुरूनानकजींचा पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणाला दोष देण्याचा नाही. मी देशाला हे सांगण्यासाठी आलोय की, तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात कृषी कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल”, अशी घोषणा मोदी यांनी केली.