जुन्नरमध्ये भरदिवसा पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू

2

जुन्नर: शिरुर  तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट्र बँकेच्या दरोड्याची घटना ताजी असताना जुन्नर तालुक्यात १४ नंबर फाट्यावर दोन दरोडेखोरांनी शस्त्र हातात घेऊन अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दरोडा टाकला. या दरोड्यात दोन लाख पंन्नास हजार रुपयांची रक्कम दरोडेखोरांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय 52) यांचा मृत्यू झाला.

१४ नंबर येथील अनंत पतसंस्था ही पुणे-नाशिक महामार्गालगत आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात हेल्मेट घातलेल्या व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश केला. व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत दोन्ही हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. यामध्ये राजेंद्र भोर हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नारायणगाव नेण्यात येत होते. मात्र, दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन मृत घोषित केले.

दरम्यान, पतसंस्थेवर दरोडा पडल्याची माहिती नारायणगाव पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पतसंस्थेतून चोरट्यांनी किती रक्कम लंपास केली, याबाबतचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पतसंस्थेच्या सीसीटीव्हीत 2 व्यक्ती हेल्मेट घालून आत आल्याचे फुटेज पोलिसांना मिळाले आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.