एसटीची एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती – शरद पवार

महाबळेश्वर: राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटलेला नसून त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्रीमध्ये बैठका सुरू आहेत. मात्र, या मुद्द्यावरून राज्य सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता त्यांनी एसटीचा आजपर्यंतचा इतिहासच समोर मांडला. तसेच, “एसटीची एवढी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती”, असं शरद पवार म्हणाले आहेत. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यांच्या मागण्या याविषयी सविस्तर भूमिका मांडली आहे.

“राज्याचे उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्री, एसटीचे सर्व अधिकारी, सदाभाऊ खोत अशी चर्चा आम्ही चार-चार तास केली. मार्ग काढण्यासाठी काही पर्याय सुचवले. पहिली गोष्ट म्हणजे एसटीची आर्थिक स्थिती वाईट आहे. १९४८ साली एसटी सुरू झाली. सुरुवातीला या मंत्रालयाचे मंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यांच्या नेतृत्वाखाली एसटीची सुरुवात झाली. पहिल्या बसने चव्हाण यांनी स्वत: प्रवास केला होता.

तेव्हापासून गेली २ वर्ष सोडली तर कधीही एसटीला राज्य सरकारकडून अॅडव्हान्स घ्यावा लागलेला नाही. स्वत:च्या ताकदीवर एसटी आपला अर्थव्यवहार सांभाळत आली आहे. अलिकडच्या काळात राज्य सरकारने ५०० कोटी रुपये एसटीला वेतनवाढ करण्यासाठी दिले. ही अवस्था एसटीची कधीही आली नव्हती. सामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचं दळणवळणाचं साधन हे आहे. एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर आम्ही चर्चा केली”, असं शरद पवार म्हणाले.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी असलेल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर देखील शरद पवारांनी भूमिका मांडली आहे. “विलिनीकरणाची मागणी केली जात आहे. त्यावर उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. त्या समितीने निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. या समितीच्या शिफारशींचा सरकार गांभीर्याने विचार करेल”, असं ते म्हणाले.