कोल्हापूर विधान परिषद निवडणूक: सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, अमल महाडीकांचा अर्ज मागे

कोल्हापूर: चुरशीच्या टप्प्यावर पोचलेल्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली. राज्य पातळीवर झालेल्या समझोत्यानुसार भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्यामुळे पाटील यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
कोल्हापूर स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने पालक मंत्री सतेज पाटील हे मैदानात उतरले होते. त्यांच्या विरोधात भाजपने माजी आमदार अमल महाडिक यांना उमेदवारी दिली होती. ४१५ मतदार या निवडणूकीत मतदान करणार होते. निवडणुकीत महाडिक आणि पालक मंत्री सतेज पाटील हा संघर्ष पुन्हा रंगू लागला होता. यामुळे मतदारांना काही लाखात रक्कम वाटली जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. सुरुवात म्हणून दोन्हीकडून मतदारांना पाकिटे पोच झाली होती. या मताचे मोल वाढत असतानाच अचानक घडलेल्या राजकीय घडामोडी ने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
राज्य पातळीवर भाजप-शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार भाजपचे उमेदवार महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. दुपारी अडीच वाजता या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी महाडिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार धनंजय महाडिक, शौमिका महाडिक, प्रा. जयंत पाटील,सुहास लटोरे उपस्थित होते.