ओमिक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर! उद्धव ठाकरे सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल, नव्या गाईडलाईन जारी
मुंबई: कोरोनाव्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. अशातच देशात ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
सगळ्यंचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. आता रिपोर्ट काय येतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकारनं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ते म्हणजे राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांसाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे जाहीर केले आहेत.
काय आहेत नवे मार्गदर्शक तत्वे..
महाराष्ट्रात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवाशांना केंद्र सरकारनं जारी केलेल्या सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे.
दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना आणि झिम्बाब्वे यांचा उच्च जोखमीच्या देशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
हाई रिस्क श्रेणीत येणाऱ्या देश किंवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक एअरपोर्टवर RT-PCR टेस्ट अनिवार्य असेल.
बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन राहावं लागेल.
सातव्या दिवशी पुन्हा एकदा RT-PCR टेस्ट होईल. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल. तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास एक आठवडा होम क्वारंटीन केलं जाईल.
हाई रिस्क श्रेणीत येणाऱ्या देश किंवा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना मागील 15 दिवसांत केलेल्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
देशांतर्गत प्रवाशांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावे. किंवा त्यांचा 72 तासांच्या आतील RT-PCR रिपोर्ट निगेटिव्ह असावा.