आरक्षण दिले तर एमआयएम महापालिका निवडणूक लढणार नाही – इम्तियाज जलील

5

औरंगाबाद: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आता मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. जलील यांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. एकीकडे आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे सरकारने मुस्लिम आरक्षण जाहीर केले, तर दुसरीकडे एमआयएम महापालिका निवडणूक लढवणार नाही, अशी मोठी घोषणा जलील यांनी केली आहे.

औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. एमआयएमने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उचलताच विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारने मुस्लीम आरक्षण द्यावे, अशी मागणी जलील यांनी केली. त्याशिवाय राज्यभरात कुठेही महापालिका निवडणूक लढवणार नाही. या सरकारने मुस्लिम आरक्षण दिले नाही तर येत्या हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर धरणे आंदोलन करू, असा इशाराच जलील यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

तसेच एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करून प्रलंबित मागण्या सोडवण्यात येण्याचीही मागणी या पत्राद्वारे केली.

मुस्लिम समाजाला त्वरीत 5 टक्के आरक्षण, मराठा आरक्षणाच्या धर्तीवर मुस्लिम समाजाच्या सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय नोकरीसाठी विधानसभेत त्वरीत कायदा मंजूर करण्यात यावा, मुस्लिम समाजाच्या विकासासाठी दरवर्षी शंभर कोटींची आर्थिक तरतूद करण्यात यावी, वक्फ मंडळाला अद्ययावत करण्यासाठी दरवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी आदी 8 मागण्या या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.