राजकारणात असेपर्यंत नारायण राणेंचा राजकीय दरारा राहणार – प्रवीण दरेकर

मुंबई: आमदार नितेश राणेंचा शोध घेत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. यानंतर भाजप नेत्यांनी आम्ही राणेंच्या पाठीमागे भक्कम उभे आहोत असं ठणकावून सांगितलं आहे. राणेंना पाठवलेल्या नोटीसवरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांचा राजकीय दरारा ते राजकारणात असेपर्यंत राहणार, असं म्हणाले.

नारायण राणेंची राजकीय दहशत कधीच नव्हती, असेल तर नारायण राणेंचा राजकीय दरारा निश्चितपणे होता. तो काल होता, आज आहे आणि जो पर्यंत राणे राजकारणात आहेत तो पर्यंत राजकीय दरारा निश्चित राहील. कारण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं, मुंबईच्या बेस्ट समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं, त्या ठिकाणी स्वत:ची छबी उमटवली. अनेक उपक्रम, बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम केलं, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

विधानसभेत आमदार म्हणून त्यांनी अत्यंत अभ्यास पूर्ण प्रश्न उपस्थित केले, भूमिका मांडल्या. राज्याचा मंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून अभूतपूर्व कामगिरी केली. सहा महिनेच मुख्यमंत्री राहिले पण त्यांनी स्वत:ची छबी निर्माण केली. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी एक राजकीय दरारा निर्माण केला. शुन्यातून माणूस काय निर्माण करु शकतो हे नारायण राणेंनी अभ्यासातून दाखवून दिलं आहे. निश्चितच केंद्राचा मंत्री म्हणून देशाला दाखवतील. आपल्याला सवय असते आपला माणूस मोठा झाला की काही लोकांना पोटशूळ उठतो, तसंच, केसरकरांना पोटशूळ उठला आहे, त्याला औषध नाही, असा टोला देखील प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना लगावला.