कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूला अटकाव घालण्यासाठी पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध

पुणे: कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव राज्यात वाढत आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात देखील कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव अधिक वाढताना दिसत आहे. या दोन्ही विषाणूला अटकाव घालण्यासाठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत या सर्व ठिकाणी पुन्हा एकदा कठोर निर्बंध  लावण्यात आले आहेत. याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  यांनी आदेश काढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. यातच पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुण्यात  देखील कोरोना बाधितांची रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. पुणे शहर आणि पूर्ण पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार ओमायक्रॉन व्हेरिएंटसह अत्यंत वेगाने होत आहे. कोरोना विषाणू तसेच ओमायक्रॉनचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पर्यटन, लग्नसराई, राजकीय तसेच धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात नवीन वर्षांपासून निर्बंध –

खुल्या किंवा बंदिस्त जागेत विवाह व त्याचे अनुषंगाने अन्य कार्यक्रम समारंभा प्रसंगी उपस्थितांची मर्यादा 50 इतकी करण्यात आली आहे.

कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक राजकीय किंवा धार्मिक समारंभप्रसंगी खुल्या किंवा बंदिस्त जागेत उपस्थितांची अधिकतम मर्यादा 50 इतकी राहील. अंत्यविधी व त्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थिताची संख्या 20 पेक्षा अधिक राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

पर्यटनस्थळे, मोकळी मैदाने गर्दी करू नये.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.