ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: 24 जानेवारीपासून शाळा पुन्हा सुरु

मुंबई: महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सोमवारपासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यात सर्व शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. राज्यात कोरोना व्हायरस आणि कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा संसर्ग वाढल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात गेल्या 20 दिवसांपासून बंद आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पणे पालण करून शाळा सुरू करण्यात येतील. शाळा सुरू करण्यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करण्यात आली होती. त्यांनी शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. राज्यात ज्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, अशाच शहरात शाळा सुरू करण्यात येतील. शाळा सुरू करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील, असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारच्या निर्णयानंतर येत्या 24 जानेवारीपासून शाळा सुरु होणार आहेत. बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार, शाळा सुरू करण्यात याव्यात, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात सरसकट शाळा सुरु होणार नसल्याचे संकेतही सरकारकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.