नाना काटे यांचा विजय काळ्या दगडावरची रेष आहे – जयंत पाटील

28

चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचे महविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. वातावरण अतिशय उत्तम आहे, नाना काटे यांचा विजय काळ्या दगडावरची रेष आहे. रस्त्यावरचा प्रचार आपण घराघरात पोहोचवावा, जोपर्यंत मतदान पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकांच्या संपर्कात रहा. आपला विजय हा निश्चित आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

आज देशात अराजकता माजली आहे. खरी बातमी दाखवणाऱ्या बीबीसी या वृत्त संस्थेवर धाड टाकली गेली. महागाई, आर्थिक डबघई, गरीबी या गोष्टी माहितीच पडायला नको ही व्यवस्था केली जात आहे. विविध वाहिन्या, पेपर या सर्वांवर दबावतंत्र वापरले जात आहे. ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या मतदारसंघात भाजपने स्वतःचा तर उमेदवार दिलाच आहे मात्र नाना काटे यांची मते खाण्यासाठी अजून एक उमेदवार दिला आहे. आपण यात विचलित न होता योग्य निवड करावी.

केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या घोषणा अमलात येण्याची काही चिन्हे नाहीत. मुख्यमंत्री शिंदे सांगतात इतके कोटी देऊ, उपमुख्यमंत्री फडणवीस सांगतात पिंपरी चिंचवड मध्ये फ्लायओव्हर बनवू… मात्र मा. अजित पवार यांनी जो पिंपरी चिंचवडमध्ये विकास घडविला आहे त्याला तोड नाही.
या देशात अनेक गोष्टींची चोरी झाली आहे. पण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पक्षाची चोरी झाली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्राच्या हातून कपटाने पक्ष हिसकावून घेतला. हे लोकांना पटलेले नाही. उद्या कार्यकर्त्यांच्या जोरावर कोणीही आमदार निवडून येईल आणि पैशांचा सौदा करेल हे लोकांना न पटणारे आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली भारतीय राज्यघटना आपल्याला जपायची असेल तर आपण रस्त्यावर उतरायला पाहिजे. म्हणून या निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा आहे. मराठवाडा, खान्देश, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागातून येऊन इथे स्थायिक झालेला मतदार आपल्याच बाजूने आहे याचा मला विश्वास आहे.
स्व. लक्ष्मण जगताप माझेही जवळचे स्नेही होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत तब्येत खालावलेली असतानाही मतदानासाठी ते आले तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले. काय गरज होती राजकारणासाठी एखाद्या आजारी व्यक्तीला त्रास देण्याची? एक दोन मते कमी पडली असती तर काय फरक पडला असता?
काल भाजपचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात येऊन म्हणाले की, त्यांना महाराष्ट्रात ४८ जागा जिंकायच्या आहेत. देशभरात भाजपची परिस्थिती डगमगली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात जागा जिंकणे गरजेचे वाटते. भाजप आणि शिंदे गटाची वृत्ती लोकांना पटलेली नाही. त्यामुळे लोकं नाना यांना निवडून देतील हा मला पूर्ण विश्वास आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.