कसबा आणि चिंचवड येथील निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला थेट नाकारले… एकूणच देशभरात बदलाचे वारे वाहू लागले – जयंत पाटील

33

आज महिन्याच्या पहिल्या शनिवारचे औचित्य साधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील साखराळे या गावात एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम राबवला. दरवेळी प्रमाणे विविध व्यक्तींना आपले मत मांडण्याची संधी दिली. काहींनी शेतीविषयी मत मांडले तर काहींनी सध्याच्या वाढत्या महागाईचा प्रश्न मांडला.

अलीकडे कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला थेट नाकारले. कसब्यातील गृहिणी उत्स्फूर्तपणे भाजपा सरकारविरुद्ध आपले मत व्यक्त करत होत्या. नागालँड मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले आहेत. एकूणच देशभरात बदलाचे वारे वाहू लागले आहेत.

नुकतेच केंद्र सरकारने सिलेंडरचे दर वाढवले आहेत. घरगुती सिलेंडर आणि कमर्शियल सिलेंडर दोघांचे भाव वाढले आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर तर आधीच वाढवून ठेवले आहेत. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी जगायचे कसे असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे.

केंद्र सरकार या महागाईवर काही व्यवस्था करत नाही. पण सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील कोणत्याही गोष्टी बाहेर पडू नये याची व्यवस्था करते. अत्यंत पारदर्शक पद्धतीने आपले मत सत्य सांगणारी वृत्त वाहिनी बीबीसीने काही दिवसांपूर्वी गोध्रा हत्याकांडाची डॉक्युमेंटरी रिलीज केली. त्यामुळे बीबीसीवर धाडसत्र सुरू केले. या धाडीतून काहीच निष्पन्न झाले नाही. ही दडपशाही लोकांना पटत नाही.

शासनाच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी स्पर्धेत सांगली जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे ही अत्यंत महत्त्वाची बातमी यावेळी उपस्थितांना सांगितली. रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर भौतिक सुविधा सुधारण्यावरही आपण भर दिलेला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.