मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा

28
पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभ हस्तांतरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम १७ ऑगस्ट रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती कार्यक्रम स्थळास भेट देऊन महिला व बालविकास मंत्री मा. आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधून घेतली. सोबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होत्या.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाची योजना असून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात या योजनेतील पात्र महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांना सर्वप्रकारच्या सोईसुविधा उपलब्ध करुन देतानाच त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी सूचना यावेळी पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी येणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाने बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, वैद्यकीय पथक, वाहतूक व्यवस्था, मोबाईल टॉयलेट, परिसराची स्वच्छता इत्यादी व्यवस्था चोखपणे कराव्यात. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणावर अर्ज करत आहेत. मात्र त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि पोर्टलवर अर्ज सादर करण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रसाद लाड, आमदार भिमराव तापकीर, आमदार योगेश टिळेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे आदी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.