ज्येष्ठ कलाकार लक्ष्मण श्रेष्ठ यांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : दृश्यकलेच्या क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०२२-२३ या वर्षातील कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारासाठी गठीत केलेल्या शोध समितीची बैठक मंगळवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. यात सन २०२२-२३ या वर्षासाठी कै.वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार नामवंत ज्येष्ठ कलाकार श्री.लक्ष्मण श्रेष्ठ यांना जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कला संचालक राजीव मिश्रा, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, महाराष्ट्राला कलेचा समृद्ध वारसा लाभला असून राज्यातील कलाकारांनी विविध क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेचे लौकिक प्राप्त केले आहे. लक्ष्मण श्रेष्ठ हे दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणारे नामवंत कलाकार आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर केल्याने या पुरस्काराची अधिक उंची वाढेल, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.