मंत्रालयात ‘DELL टेक्नॉलॉजी’ आणि ‘लर्निंग लिंक्स फाउंडेशन’च्या प्रतिनिधींसोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची महत्त्वाची बैठक; उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि क्लाउड कॉम्प्युटिंग कोर्सेसवर भर
मुंबई : राज्यातील उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवून देत त्यांची रोजगारक्षमता वाढवण्यासाठी, मंत्रालयात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ‘DELL टेक्नॉलॉजी’ आणि ‘लर्निंग लिंक्स फाउंडेशन’च्या ‘उडान (UdAAN)’ कार्यक्रमाच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व रोजगाराभिमुख कौशल्य विकासाच्या विविध संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीविषयी अधिक माहिती देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, बदलत्या काळाची गरज ओळखून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या भविष्यातील प्रगत तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला आहे. या प्रशिक्षणांमुळे उद्योगांच्या बदलत्या गरजांसाठी आपले विद्यार्थी पूर्णपणे सक्षम आणि तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केवळ पारंपरिक शिक्षण न देता, विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित उद्योग व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या दिशेने ही सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मंत्री पाटील यांनी नमूद केले.
या बैठकीला अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. प्रमोद नाईक, DELL टेक्नॉलॉजीचे CSR प्रमुख प्रभात भट्टाचार्य आणि लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे गणेश भागवत उपस्थित होते.