मंत्रालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंगविण्याची कार्यशाळा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती
मुंबई : गणेशोत्सवाच्या पवित्र पावन पर्वावर मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात ‘Paint Your Own Paper Mache Bappa’ या अनोख्या आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती रंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या नाविन्यपूर्ण उपक्रमाला राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष भेट दिली. याप्रसंगी त्यांनी स्वतः कलाकारांच्या उत्साहात सहभागी होत, हातकागदापासून तयार केलेल्या सुंदर गणेशमूर्तीला नैसर्गिक रंगांनी रंगविण्याचा मनसोक्त आनंद घेतला.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (PoP) मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी हातकागदाच्या गणेशमूर्ती हा एक उत्तम आणि शाश्वत पर्याय म्हणून समोर येत आहे. या मूर्तींचे विसर्जन अत्यंत जलद गतीने होते आणि त्या पाण्यात सहज विरघळतात. या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, या माध्यमातून केवळ पर्यावरण संवर्धनच होत नाही, तर आपली पारंपारिक हातकागद कला, स्थानिक कारागीर आणि ग्रामीण भागातील रोजगारालाही मोठी चालना मिळते. “श्रद्धा जपूया, पर्यावरणही जपूया आणि स्थानिक कलेला बळ देऊया” असा महत्त्वपूर्ण संदेशही त्यांनी यावेळी दिला.
या कार्यशाळेला मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हा संदेश राज्यभरात पोहोचण्यास यामुळे मदत होईल अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.