मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून बाप्पाचे भावपूर्ण दर्शन
मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या लाडक्या श्री गणरायाचे अत्यंत भक्तिभावाने दर्शन घेतले. गणेशोत्सवाच्या या मंगलमय पर्वावर त्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर उपस्थित राहून बाप्पाच्या चरणी मनोभावे नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.
या दर्शन सोहळ्यानंतर भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, विघ्नहर्त्या गणरायाच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विकासाची वाटचाल अशीच अखंड व वेगाने सुरू राहो. बाप्पाच्या चरणी लीन होत त्यांनी, “महाराष्ट्राच्या एकूणच विकासाला नवी गती मिळो आणि राज्यातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात सुख, अखंड समाधान आणि समृद्धी नांदो,” अशी मनोभावे प्रार्थना केली.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबीयांसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.