मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते पटल्या (गुरुजी) मावस्कर यांचे निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

7

मुंबई : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे (BJP) ज्येष्ठ व अत्यंत एकनिष्ठ नेते पटल्या (गुरुजी) मावस्कर यांचे सोमवार, १५ जून रोजी पहाटे अमरावती येथील चौधरी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. पटल्या (गुरुजी) मावस्कर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पटल्या (गुरुजी) मावस्कर यांचे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान अत्यंत मोठे होते. अमरावती जिल्ह्यातील विशेषतः मेळघाटमधील आदिवासी बांधवांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांना नेहमी योग्य मार्गदर्शन करणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि पक्षविचारांशी आयुष्यभर प्रामाणिक व निष्ठावान राहिलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. शोकभावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मावस्कर गुरुजी यांच्या जाण्याने भाजपा परिवाराने एक ज्येष्ठ मार्गदर्शक आणि जनतेशी नाळ जोडलेला सच्चा लोकप्रतिनिधी गमावला आहे. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो आणि मावस्कर कुटुंबीयांना तसेच त्यांच्या असंख्य समर्थकांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत त्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

पटल्या गुरुजी मावस्कर हे मूळचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांनी सन १९९४ ते १९९९ या कालावधीत मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले होते. दुर्गम मेळघाटातील आदिवासी बांधवांचे प्रश्न, त्यांचे शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.