महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान अत्यंत मोलाचे असून, हे क्षेत्र अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध – मंत्री चंद्रकांत पाटील

9

पुणे : पुणे येथे महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादितच्या नवीन संचालक मंडळ कार्यालयाचे आणि सहकारी पदाधिकारी परिषदेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान अत्यंत मोलाचे असून, हे क्षेत्र अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.

पाटील पुढे म्हणाले, राज्यातील सहकार विभाग हे एक मोठे विश्व असून, आपली महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आज नफ्यात कार्यरत आहे, ही आनंदाची बाब आहे. मात्र, हे यश टिकवून ठेवण्यासाठी आणि या क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी राजकीय तसेच सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य प्रशिक्षणाची नितांत गरज आहे. याच हेतूने, सहकारी संघाच्या राज्यभर असलेल्या केंद्रांद्वारे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातील, असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केंद्रात स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून या क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. त्याची धुरा गृहमंत्री अमित शाहजी यांच्याकडे सोपवली आहे. केंद्राने ज्या धर्तीवर सहकार विद्यापीठ निर्माण केले आहे, त्याच धर्तीवर आपल्या राज्यातही स्वतंत्र राज्यस्तरीय सहकार विद्यापीठ स्थापन करण्याबाबत किंवा विद्यापीठ स्तरावर नवीन विभाग सुरू करण्याबाबत आम्ही सकारात्मक पावले उचलत आहोत, असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी दिले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, आमदार सुनील कांबळे, प्रशासकीय मंडळ अध्यक्ष विद्याधर अनास्कर, दिपक तावरे, सिद्धार्थ कांबळे, संजीव कुसाळकर, शिवाजी नलावणे यांच्यासह सहकारी संघाचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.