ईश्वरपूर येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक; धैर्यशील कदम यांना विजयी करण्याचा महायुतीचा निर्धार
सांगली : ईश्वरपूर येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करत, महायुतीच्या विकासाभिमुख विचारांना अधिक बळ देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला. महायुती सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांची माहिती देत, तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजनाबाबत चर्चा केली. या विशेष बैठकीत आगामी निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रभावी नियोजनाबाबत स्थानिक नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजीत देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मनोज घोरपडे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद पवार तसेच महायुतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.