विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
मुंबई : मंत्रालयात एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्य, संरक्षण व सक्षमीकरणासाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘धोरण-२०२६’ बाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी या धोरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन यावेळी पाटील यांनी केले.
HSNC विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने तयार केलेला अहवाल उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर व सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे यांच्याकडे सादर करण्यात आला.
या बैठकीबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक, सामाजिक किंवा शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागू नये, तसेच त्यांना आवश्यक शैक्षणिक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी हे धोरण तयार करण्यात येत आहे. या धोरणाचा लाभ देताना संबंधित विद्यार्थी-विद्यार्थिनीची संमती घेण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोऱ्हाडे, HSNC विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, समितीचे सदस्य तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.