खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदेच्या ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि पर्यावरण’ समितीच्या अध्यक्षपदी निवड; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

11

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संसदेच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल’ विषयक स्थायी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. कुलकर्णी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या असून पुण्याच्या माजी आमदार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. संसदेतील सक्रिय आणि अभ्यासू कामगिरीमुळे त्यांना यापूर्वी ‘संसदरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या मोठ्या यशाबद्दल महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. मेधा कुलकर्णी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, संसदेतील त्यांचा अभ्यासू, प्रभावी आणि जनहिताचा आवाज आता या महत्त्वपूर्ण समितीच्या माध्यमातून अधिक सक्षमपणे देशाच्या धोरणनिर्मितीत योगदान देईल, याची खात्री आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विज्ञान, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांना निश्चितच नवी दिशा मिळेल ,असे पाटील यांनी म्हटले.

राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी नियुक्तीबाबतचे अधिकृत पत्र डॉ. कुलकर्णी यांना प्रदान केले. विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन तसेच हवामान बदलाशी संबंधित धोरणे, विधेयके आणि विविध विषयांचा अभ्यास करण्याची जबाबदारी या संसदीय स्थायी समितीकडे असते. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदाला विशेष महत्त्व मानले जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.