‘दैनिक प्रभात’चे ज्येष्ठ छायाचित्रकार संदीप घोडके यांचे अल्पशा आजाराने निधन; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

6

पुणे : ‘दैनिक प्रभात’चे ज्येष्ठ आणि अत्यंत लोकप्रिय वृत्तपत्र छायाचित्रकार संदीप अशोक घोडके यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पुणे आणि परिसरातील पत्रकारिता तसेच छायाचित्रण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

संदीप घोडके यांच्या निधनाची बातमी समजताच महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. चंद्रकांत पाटील आपल्या शोकसंदेशात म्हणाले, प्रभातचे वृत्तपत्र छायाचित्रकार संदीप अशोक घोडके यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपल्या उत्कृष्ट छायाचित्रणातून समाजातील विविध घडामोडी अत्यंत प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवल्या. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि घोडके कुटुंबियांना या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो.

संदीप घोडके यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत ‘दैनिक प्रभात’च्या माध्यमातून अनेक ऐतिहासिक, राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे उत्कृष्ट क्षणचित्रे आपल्या कॅमेऱ्यात टिपली होती. त्यांच्या निधनाबद्दल पुण्याच्या पत्रकार वर्तुळातून आणि विविध सामाजिक संस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.