दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; अन्यथा महाविद्यालयांवर कारवाई! – मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, १२ ऑक्टोबर : राज्यातील ३४ जिल्ह्यांमधील २६५ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांतील विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत उच्च शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे, याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या भूमिकेनुसार, विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन करून शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडू नये आणि त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी शासनाच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाला मंत्री पाटील यांनी दिल्या आहेत.
या प्रसंगी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल ,उपसचिव प्रताप लुबाळ, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र कुलगुरू, अधिकारी (ऑनलाईन) व संबंधित अधिकारी उपस्थित होते.