राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचा डंका; चार ग्रामपंचायतींनी देशपातळीवर मारली बाजी; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

6

मुंबई : केंद्र सरकारच्या पंचायती राज मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५’ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. देशपातळीवरील विविध श्रेणींमध्ये राज्याने प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बहुमान पटकावून महाराष्ट्राची मान देशात उंचावली आहे . या उल्लेखनीय यशाबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्या ग्रामपंचायतींचे, लोकप्रतिनिधींचे आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे

महाराष्ट्रातील विजयी ग्रामपंचायती आणि त्यांच्या श्रेणी

इटगाव ग्रामपंचायत (जिल्हा भंडारा) : ‘बालस्नेही पंचायत’ श्रेणीमध्ये संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावला
खारीवली ग्रामपंचायत (जिल्हा रायगड) : ‘जल-समृद्ध पंचायत’ श्रेणीमध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला
चांभारली ग्रामपंचायत (जिल्हा रायगड) : ‘सामाजिकदृष्ट्या न्याय्य व सुरक्षित पंचायत’ श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक प्राप्त केला
निंबाळे ग्रामपंचायत (जिल्हा नाशिक) : ‘सुशासन ग्रामपंचायत’ श्रेणीमध्ये देशपातळीवर द्वितीय क्रमांक मिळवला

या देदीप्यमान यशाबद्दल बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, ही कामगिरी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गतिमान लोकसहभाग, विकासाभिमुख नेतृत्व आणि प्रभावी प्रशासनाची जिवंत साक्ष देणारी आहे . तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आपल्या ग्रामपंचायतींनी केलेले कार्य इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल .

मंत्री पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्या सरपंचांचे, ग्रामपंचायत सदस्यांचे, जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आणि या विकासकामात मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे विशेष कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.