पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षपूर्तीनिमित्त कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद; मोदी सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा घेतला आढावा

16

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. मोदीजींच्या नेतृत्वाखालील ही १२ वर्षे लोककल्याण, सुशासन आणि देशाच्या सर्वांगीण विकासाला समर्पित ठरली आहेत,” अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारच्या गौरवशाली कार्यकाळाचा आढावा घेतला. या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पावसकर, महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दीर्घकाळ देशसेवेचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराचे स्वप्न साकार करणे आणि जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवणे यांसारखे ऐतिहासिक टप्पे पार पाडत देश आता २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विकास आणि सांस्कृतिक वारसा यांचा उत्तम समतोल साधत भारताला जगाच्या अग्रस्थानी नेण्याचे कार्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे सुरू आहे.

केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी योजनांमुळे देशातील सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले असल्याचे सांगत त्यांनी खालील आकडेवारी मांडली:

सुकन्या समृद्धी योजना: साडेचार कोटींहून अधिक मुलींचे भविष्य या योजनेमुळे सुरक्षित झाले आहे.

लखपती दीदी योजना: मोदीजींच्या संकल्पनेतून देशातील १ कोटीपेक्षा जास्त महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत.

अटल पेन्शन योजना: देशातील ३ कोटींहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला असून, यामुळे सर्वसामान्यांना वृद्धत्वाचा आर्थिक आधार मिळाला आहे.

घरकुल व पाणी योजना: प्रधानमंत्री आवास योजना आणि ‘हर घर नल से जल’ उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागाचा कायापालट झाला आहे.

पाटील यांनी पुढे नमूद केले की, मोदी सरकारने देशात ६८ कोटी नवीन बँक खाती उघडून बँकिंग क्षेत्रात आणि डिजिटल पेमेंटमध्ये मोठी क्रांती घडवली आहे. पूर्वीच्या व्यवस्थेतील मध्यस्थांची साखळी मोडीत काढत, आता दिल्लीहून एका क्लिकवर देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान (DBT) जमा होत आहे, ज्याचा थेट फायदा बळीराजाला मिळत आहे.

सर्वसामान्य जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दृढ विश्वास आहे. त्यांनी दिलेल्या स्वच्छतेच्या हाकेला प्रतिसाद देत देशातील १४२ कोटी जनतेने ‘स्वच्छ भारत’ हे स्वतःचे वैयक्तिक मिशन मानले. याच जनआंदोलनामुळे आज आपल्या देशातील शहरे, गावे आणि सरकारी कार्यालये स्वच्छ व सुंदर झाली आहेत, असे गौरवोद्गार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

Get real time updates directly on you device, subscribe now.